Advertisement
मांढरे, कुलकर्णी आणि आता हवालदार, 3 कि.मी.च्या आतच सगळं कांड
पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मनीषा हवालदार या आणखी एका प्राध्यापिकेला अटक केली. त्यामुळे NTA मध्ये नियुक्त असलेले तीन विषयांचे तीन शिक्षक पुण्यातून अटक झाल्याचं चित्र आहे. मनिषा मांढरे या बायोलॉजीचा पेपर सेट करण्यासाठी, मनिषा हवालदार या फिजिक्सचा पेपर सेट करण्यासाठी तर पी.व्ही.कुलकर्णी हा केमिस्ट्रीच्या पेपरचे भाषांतर करण्यासाठी NTA मधे काम करत होता. भारतासारख्या इतक्या मोठ्या देशात, हजारो शिक्षक असताना पुण्यातीलच तीन शिक्षकांची NTA मध्ये निवड होणं NTA च्या कारभाराबद्दल संशय निर्माण करणार ठरतंय. विशेष म्हणजे हे तीन शिक्षक पुण्यातील शिवाजीनगर, डेककन आणि बुधवार पेठ या दोन ते तीन किलोमीटरच्या रेडीयसमधे असलेल्या शिक्षण संस्थेत किंवा क्लासमधे शिकवत होते.
आधी मनीषा वाघमारे, मग मनीषा मांढरे आणि आता मनीषा हवालदार... NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आणखी एका मनीषाला अटक केली आहे. यावेळी अटक केलेल्या मनीषा हवालदार या पुण्याच्या बुधवार पेठेतील शेठ हिरालाल सराफ प्रशालेत मागील ३४ वर्षांपासून फिजिक्स शिकवत होत्या आणि शाळेच्या मुख्याध्यापिका देखील होत्या. NTA मध्ये फिजिक्स विषयाचा पेपर सेट करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्या NEET मध्ये काम करत होत्या याची माहिती न त्यांच्या महाविद्यालयातील सहकाऱ्यांना होती न संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना होती.
या आधी सीबीआयने शिवाजीनगर भागातील मॉडर्न महाविद्यालयात बायोलॉजी शिकवणाऱ्या आणि NTA मध्ये पेपर सेटिंगचं काम करणाऱ्या मनीषा मांढरेना अटक केली. तर पुण्यातील डेक्कन भागातील मोटेगावकरच्या क्लासमध्ये केमिस्ट्री शिकवणाऱ्या आणि NTA मध्ये केमिस्ट्रीच्या प्रश्नपत्रिकेच मराठीत भाषांतर करण्याची जबाबदारी असलेल्या पी.व्ही.कुलकर्णीला देखील बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळं फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयांसाठी NTA मध्ये काम करणारे तीन शिक्षक पुण्यातून अटक झाले आहेत.
शिक्षकांची टोळी....
देशात हजारो शिक्षक असताना NEET कडून पुण्यातील तीन शिक्षकांचीच निवड का करण्यात आली? ही निवड करण्यामागे कोणाचा हात होता? NTA मधील कोणी अधिकारी सामील असल्याशिवाय या निवडी होऊ शकतात का? आणि या टोळीने पेपर याआधी देखील पेपर फोडला होता का? हे असे अनेक प्रश्न सध्या लोकांच्या मनात आहेत. NTA कडून या प्रश्नांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे.NTA कडून ती नाही मिळाली तर सीबीआयने तपासाच्या माध्यमातून ती देणं गरजेचं आहे.
