Advertisement
उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ 3 खासदार शिल्लक
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सर्वात मोठा भूकंप झाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 पैकी 6 खासदार फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी आखण्यात आलेले ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे.
या मोठ्या राजकीय बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे आता केवळ 3 खासदार शिल्लक राहिल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांचा समावेश आहे. या सर्व कायदेशीर घडामोडी आणि संभाव्य फुटीच्या विरोधात आता ठाकरे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. या संपूर्ण राजकीय नाट्याची सुरुवात 13 जून 2026 रोजी झाली, जेव्हा ठाकरे गटाच्या काही खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. ही चर्चा समोर येताच उद्धव ठाकरे यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी तातडीने 14 जून 2026 रोजी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीला अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे प्रत्यक्ष हजर राहिले, तर संजय दिना पाटील हे बैठक संपल्यानंतर मातोश्रीवर पोहोचले. नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख हे या बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते. मात्र, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय जाधव हे या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले.
मातोश्रीवरील गैरहजेरीची चर्चा थांबत नाही तोपर्यंत 15 जून 2026 रोजी यवतमाळचे खासदार संजय देशमुख थेट दिल्लीत पोहोचले. त्यांनी तिथे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार आणि राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. याच दिवशी मुंबईत उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी खासदारांच्या पक्षांतराचे सर्व दावे फेटाळून लावले. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी तातडीने दिल्ली गाठली. दुसरीकडे, ठाकरे गटाचे 5 ते 6 खासदार स्वतंत्र गट स्थापन करून शिंदे गटात विलीनीकरण करण्याच्या हालचाली करत असल्याच्या बातम्या राष्ट्रीय पातळीवर झळकू लागल्या.
