#

Advertisement

Wednesday, June 17, 2026, June 17, 2026 WIB
Last Updated 2026-06-17T14:17:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"लाडक्या बहिणीं"साठी 344 कोटींचा निधी मंजूर

Advertisement

मे महिन्याचा हप्ता आता खात्यात जमा होणार 

पुणे: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती घटकांतर्गत या योजनेसाठी निधी वितरणास मंजुरी देण्यात आली असून यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 10 जून 2026 रोजी शासन निर्णय जारी केला आहे.
शासन निर्णयानुसार, सन 2026-27 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी लेखाशिर्ष 2235D767 अंतर्गत एकूण 3000 कोटी रुपये इतका नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून अनुसूचित जाती घटकांतील पात्र महिला लाभार्थींना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. वित्त विभागाच्या 9 एप्रिल 2026 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार निधी वितरणाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मे 2026 महिन्याचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी 344.74 कोटी रुपये निधी महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांना वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, उपलब्ध निधीचा वापर करताना वित्तीय नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच मंजूर तरतुदीनुसार निधीचा खर्च याच आर्थिक वर्षात पूर्ण होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खर्चाचा तपशील, निधी उपयोगिता प्रमाणपत्र आणि उद्दिष्टपूर्तीचा अहवाल संबंधित विभागांनी दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सादर करणे आवश्यक राहणार आहे.
योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागावर सोपविण्यात आली आहे. लाभार्थी महिलांची छाननी करून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव निधी त्यांच्याच लाभासाठी वापरला जाईल, याचीही खबरदारी घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. सदर शासन निर्णयाला वित्त विभागाची मान्यता मिळाली असून तो राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.