#

Advertisement

Wednesday, June 17, 2026, June 17, 2026 WIB
Last Updated 2026-06-17T14:11:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून खलबतं !

Advertisement

पुण्यातल्या ‘या’ महिला नेत्याची नियुक्ती 

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी अखेर पुण्याच्या वैशाली नागवडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची उशिरापर्यंत बैठक पार पडली. या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्षपदासह संघटनेतील विविध रिक्त पदांवर नियुक्त्यांबाबत चर्चा करण्यात आली.
भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. या पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू असताना पुण्यातील राष्ट्रवादीच्या आक्रमक नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या देखील इच्छुक असल्याचे बोलले जात होते. मात्र, पक्ष नेतृत्वाने ठोंबरे यांना संधी न देता वैशाली नागवडे यांच्यावर विश्वास दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची निवड निश्चित करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी अध्यक्षपदी आकाश झांबरे यांच्या नावावरही सहमती झाल्याचे समजते. वैशाली नागवडे या सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली आहे.