#

Advertisement

Tuesday, June 2, 2026, June 02, 2026 WIB
Last Updated 2026-06-02T17:54:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लोकप्रतिनिधी गायब ; मल्लेवाडीत रास्ता रोको

Advertisement

मान नदीकाठच्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई 

मंगळवेढा : तालुक्यातील मान नदीकाठच्या गावांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई आणि तीव्र उष्णतेचे संकट निर्माण झाले आहे. वाढत्या तापमानामुळे शेतातील पिके करपण्याच्या स्थितीत आली असून शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मान नदीमध्ये तात्काळ पाणी सोडण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी बांधवांनी मल्लेवाडी चौक येथे रास्ता रोको आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र, शेतकऱ्यांच्या इतक्या महत्त्वाच्या आंदोलनात इतर कोणताही राजकीय पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याची बाब चर्चेचा विषय ठरली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमी राजकारण करणारे अनेक नेते या आंदोलनाकडे फिरकलेही नाहीत, अशी भावना अनेक आंदोलकांनी व्यक्त केली.
या आंदोलनात महमदाबाद. शेटफळ, तनाळी, मारापूर, ढवळस, गुंजेगाव, धर्मगाव, मल्लेवाडीसह मान नदीकाठच्या  गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी, व्यथा आणि प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.आंदोलनस्थळी उजनी प्रकल्पाचे अधिकारी, पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मल्लेवाडी चौकातील रास्ता रोको आंदोलन हे केवळ पाण्याच्या मागणीसाठीचे आंदोलन नाही; ते ग्रामीण भागातील वाढत्या असंतोषाचे प्रतीक आहे. एका बाजूला उष्णतेचा विक्रमी कहर, दुसऱ्या बाजूला सिंचनासाठी पाण्याचा अभाव आणि त्यातून उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेली पिके, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.अशा वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे लोकप्रतिनिधींचे प्राथमिक कर्तव्य असते. परंतु, मल्लेवाडीतील आंदोलनात शेकडो शेतकरी उपस्थित असताना बहुतांश राजकीय नेते आणि  लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. निवडणुकांच्या काळात शेतकऱ्यांच्या दारात जाणारे नेते संकटाच्या काळात मात्र दिसत नाहीत, ही वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली.
मान नदीत पाणी सोडण्याचा प्रश्न हा केवळ प्रशासकीय फाईलमधील विषय नसून हजारो कुटुंबांच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. प्रशासनाने वेळ न दवडता वस्तुस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेणे गरजेचे आहे. अन्यथा आजचा रास्ता रोको उद्याच्या तीव्र जनआंदोलनाचे रूप घेऊ शकतो.