Advertisement
शिर्डी : अहिल्यानगरच्या शिर्डी येथे बी. दि. चेंज फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय 'पर्व चौथे' अंतर्गत आदर्श प्राचार्य आणि शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. या समारंभात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षक व प्राचार्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये शाहू शिक्षण संस्थेच्या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य ईश्वर क्षीरसागर यांना "आदर्श प्राचार्य पुरस्कार" जाहीर होऊन त्यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
शाहू शिक्षण संस्थेच्या शाळेत प्राचार्य ईश्वर क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धतीवर भर दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने शैक्षणिक निकालांसोबतच सहशालेय उपक्रम, क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्येही लक्षणीय प्रगती केली आहे. प्राचार्य क्षीरसागर यांनी शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदल वेळोवेळी स्वीकारले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झाली. यासह शिक्षकांसाठी नियमित कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून अध्यापनाची गुणवत्ता वाढवली. त्यामुळे शिक्षकवर्गात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. केवळ गुणांवर भर न देता विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा, मार्गदर्शन शिबिरे आणि करिअर समुपदेशनाची व्यवस्था केली. शाळेला समाजाशी जोडण्यासाठी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आणि आरोग्य शिबिरांसारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान जागृत केले. त्यांच्या याच सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शाळेची शैक्षणिक प्रतिमा उंचावली आणि विद्यार्थी घडणीत मोलाची भर पडली. पुरस्कार मिळाल्यानंतर प्राचार्य ईश्वर क्षीरसागर यांनी शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे आणि संचालिका ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी कामाची संधी दिली याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुरस्काराचे श्रेय आपल्या संपूर्ण शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालकांना देत यापुढेही शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
पुरस्काराचे महत्त्व
बी. दि. चेंज फाउंडेशनचा हा राज्यस्तरीय पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामाची दखल घेण्यासाठी दिला जातो. 'पर्व चौथे' या उपक्रमाअंतर्गत राज्यभरातील गुणवंत शिक्षक आणि प्राचार्यांची निवड करून त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरावे हा उद्देश आहे. ईश्वर शिरसागर यांना मिळालेला आदर्श प्राचार्य पुरस्कार हा त्यांच्या समर्पित कार्याचा आणि शाहू शिक्षण संस्थेच्या एकूण शैक्षणिक प्रगतीचा गौरव आहे. या सन्मानामुळे शाहू शिक्षण संस्था आणि संपूर्ण शिक्षकवर्गाला नवा उत्साह मिळाला आहे.
