#

Advertisement

Saturday, June 6, 2026, June 06, 2026 WIB
Last Updated 2026-06-07T05:37:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिवराज्याभिषेक सोहळ्यात 'शाहू शिक्षण संस्थे'चा सक्रिय सहभाग

Advertisement

 


रायगड संवर्धनासाठी राणी पुतळाबाई विधी महाविद्यालयातर्फे ५१,००० रुपयांचा निधी सुपूर्द !

किल्ले रायगड : "छत्रपती शिवाजी महाराजांनी १२ बलुतेदार, दलित, मागासवर्गीय आणि अठरापगड जातीच्या रयतेला सोबत घेऊन, कोणताही भेदभाव न करता न्यायाचे आणि समतेचे 'हिंदवी स्वराज्य' स्थापन केले. शिवरायांच्या याच लोककल्याणकारी विचारांची उतराई म्हणून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, याच पवित्र जाणिवेतून हे योगदान देण्यात आले आहे," अशी भावना माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केली.

किल्ले रायगडावर संपन्न झालेल्या अभूतपूर्व शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी शाहू शिक्षण संस्थेच्या राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालयाकडून रायगड संवर्धनाच्या कामासाठी ५१,००० रुपयांचा धनादेश राज्याभिषेक सोहळा समितीकडे सुपूर्द करण्यात आला. श्रीमंत संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष कोमल साळुंखे ढोबळे, महालक्षवेधी मिडियाचे अजय साळुंखे, यांच्या सन्माननीय उपस्थितीत प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे साहेब यांच्या हस्ते हा धनादेश देण्यात आला. हे धन स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या संवर्धनाच्या पवित्र कामासाठी उपयोगात आणले जाणार आहे.

या देदीप्यमान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी माजी मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे संपूर्ण कुटुंब, तसेच शाहू शिक्षण संस्थेतील २०० विद्यार्थी आणि शिक्षक किल्ले रायगडावर उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात सर्वांनी शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची शाहिरी अनुभवली. मुख्य दिवशी राजसदरेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होताना संपूर्ण परिसर भावुक झाला होता.


हजारो-लाखो शिवभक्तांच्या अथांग गर्दीने फुलून गेलेली हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि शिवराज्याभिषेकाचा तो शाही थाट 'याचि देही, याचि डोळा' अनुभवणे हे सर्वांसाठीच एका स्वर्गीय सुखाचा साक्षात्कार ठरले, दऱ्याखोऱ्यात घुमणारा 'प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, छत्रपती शिवाजी महाराज' या जयघोषाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. रायगडावरून मिळालेली ही शिवविचारांची ऊर्जा सर्वांना समाजकार्यात आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी सदैव प्रेरित करत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.