#

Advertisement

Monday, June 15, 2026, June 15, 2026 WIB
Last Updated 2026-06-16T14:27:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महिला आघाडीचे नेतृत्व करीत ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची ठळक भूमिका

Advertisement

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलनाला यश

पंढरपूर : राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, पीकविमा, शेतीमालाला हमीभाव तसेच इतर विविध प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन अखेर तीन दिवसांनंतर मागे घेण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रोहित पवार यांनी उपोषण सोडले. या आंदोलनाने राज्यभरातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आणले.

उपोषणास प्रारंभ होण्यापूर्वी संपूर्ण पंढरपूर शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला होता. शेतकरी, महिला, युवक आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मोर्चाच्या अग्रभागी राहून त्यांनी महिलांचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या आणि शेतकरी महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

मोर्चादरम्यान शेतकरी प्रश्नांबाबत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि शेतीमालाला योग्य दर मिळावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

उपोषणस्थळीही वातावरण चैतन्यमय ठेवण्यात ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून सरकारच्या धोरणांवर टीका केली. विशेषतः ‘बुरगुंडा’ या पारंपरिक लोकगीताच्या सादरीकरणातून त्यांनी राज्य सरकारवर शेतकरी प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या सादरीकरणाला आंदोलनस्थळी उपस्थित शेतकरी आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला राज्यभरातील विविध संघटना, शेतकरी प्रतिनिधी आणि पक्ष कार्यकर्त्यांचा पाठिंबा लाभला. तीन दिवस चाललेल्या आंदोलनानंतर सरकारच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. दरम्यान, पंढरपूरमधील या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या सक्रिय भूमिकेची राजकीय व सामाजिक वर्तुळात विशेष चर्चा होत आहे.