Advertisement
मुंबई: राज्यात राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा सुरू असून शिंदेंच्याशिवसेनेकडून ऑपरेशन टायगर जोर धरत आहे. ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे 7 खासदार शिवसेनेत दाखल होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच, 16 आमदार आणि 7 खासदारांची एकनाथ शिंदे सोबत अंतिम बोलणी झाली आहे, केवळ पक्षप्रवेश तारीख निश्चित करायचं राहिले आहे, असा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आहे. विशेष म्हणजे, ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे एकनिष्ठ खासदार ओमराजे निंबाळकर हे ही फुटणार असल्याची चर्चा आहे.
ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाल्याने शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला प्रत्यक्ष केवळ 4 खासदार उपस्थित होते. तर, इतर 5 खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. त्यामध्ये, धाराशिव लोकसभा मतदारसंघातील खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही ऑनलाईन हजेरी लावल्याचं सांगण्यात आलं. विशेष म्हणजे, ज्यांनी ऑनलाईन हजेरी लावली त्यांना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, ओमराजे निंबाळकर यांनी तसा कुठलाही प्रयत्न न केल्याने ओमराजे निंबाळकर हेही ठाकरेंची साथ सोडण्याच्या वाटेवर असल्याचं दिसून येत आहे. ओमराजेंनी गेल्या अनेक वर्षांपासून ते उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. मात्र, ठाकरेंनी बोलवलेल्या गेल्या दोन बैठकांना ओमराजेंची अनुपस्थितीत होती, तर कालच्याही बैठकीला ओमराजेंनी कौटुंबिक कारण देत ते उपस्थित राहिले नाहीत.
ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवेळी भाजप महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गद्दार गद्दार म्हणून टीका केली होती, तर आपण ठाकरेंची साथ कधीही सोडणार नाही, आपण मंत्रिपदाची ऑफर नाकारल्याचंही ते सांगत होते. मात्र, आता त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
