#

Advertisement

Monday, June 22, 2026, June 22, 2026 WIB
Last Updated 2026-06-22T12:10:26Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाराष्ट्राच्या राजकारणातील नितीमत्तेचा ऱ्हास थांबला पाहिजे : ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे

Advertisement

पुणे : महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही विचार, मूल्ये, लोकशाही आणि सामाजिक बांधिलकी यांवर उभी राहिलेली आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरद पवार यांसारख्या नेत्यांनी मतभेद असले तरी लोकशाही मूल्यांचा आदर राखत राज्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या घटनांनी या समृद्ध परंपरेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सत्तेच्या राजकारणासाठी पक्षफोड, आमदारांची गळती, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर दबाव, तपास यंत्रणांच्या वापराबाबत सातत्याने होणारे आरोप आणि सत्ता टिकविण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची मानसिकता ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्त केले.

ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, निवडणुकीत मतदार एखाद्या व्यक्तीला केवळ उमेदवार म्हणून निवडून देत नाही, तर त्या व्यक्तीच्या पक्षाच्या विचारसरणीवर आणि जाहीर भूमिकेवर विश्वास ठेवून मतदान करतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा सत्तेच्या मोहापायी पक्षांतर करणे म्हणजे मतदारांच्या विश्वासाशी केलेली प्रतारणा आहे. लोकशाहीत मतदार हा सर्वोच्च असतो आणि त्याच्या कौलाचा आदर करणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे नैतिक कर्तव्य आहे. परंतु, सध्या, महाराष्ट्रात राजकीय निष्ठेपेक्षा सत्तेची गणिते अधिक महत्त्वाची बनली आहेत. पक्ष फोडणे, आमदारांना आपल्या गोटात आणण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करणे, राजकीय दबावाचे वातावरण निर्माण करणे आणि शासकीय यंत्रणांचा वापर राजकीय उद्देशांसाठी होत असल्याचे सातत्याने आरोप समोर येत आहेत, अशा घटनांमुळे लोकशाही संस्थांवरील विश्वास कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ॲड. साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये विचारांची लढाई असावी, व्यक्तींची खरेदी-विक्री किंवा दबावाचे राजकारण असू नये. विरोधी पक्ष हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असतो. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे, जनतेच्या समस्या मांडणे आणि पर्यायी भूमिका मांडणे हे विरोधकांचे कर्तव्य आहे. परंतु विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ लागला, तर लोकशाहीची गुणवत्ता कमी होते.

ॲड. साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले की, राजकारण हे समाजसेवेचे माध्यम आहे, सत्तेचे साधन नव्हे. आज अनेक तरुण राजकारणाकडे आशेने पाहत आहेत. परंतु, जर त्यांच्यासमोर तत्त्वांपेक्षा सत्तेसाठी होणारे तडजोडीचे राजकारण उभे राहिले, तर भविष्यात लोकांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास कमी होऊ शकतो. त्यामुळे राजकीय पक्षांनी आणि लोकप्रतिनिधींनी नैतिकतेची चौकट पाळणे आवश्यक आहे.

महिलांच्या राजकीय सहभागाचा उल्लेख करताना ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले की, महिलांनी मूल्याधिष्ठित राजकारणाला बळ द्यावे. पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जनतेप्रती प्रामाणिकपणा हीच खरी राजकीय संस्कृती आहे. समाजातील वंचित, शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे राजकारणच राज्याला पुढे घेऊन जाईल. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राची राजकीय ओळख ही विचारांची, सहिष्णुतेची आणि लोकशाही मूल्यांची राहिली आहे. ही परंपरा टिकविण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि नागरिकाने जागरूक राहणे आवश्यक आहे. सत्ता येते-जाते. मात्र, जनतेचा विश्वास आणि लोकशाही मूल्ये कायम राहिली पाहिजेत. राजकीय नितीमत्ता, संविधानावरील श्रद्धा आणि मतदारांच्या कौलाचा सन्मान या तत्त्वांवरच महाराष्ट्राचे भविष्य अधिक मजबूत होईल. महाराष्ट्राच्या राजकारणात विचारांचा संघर्ष असावा, व्यक्तींची फोडाफोडी नव्हे; विकासाची स्पर्धा असावी, सत्तेसाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्याची प्रवृत्ती नव्हे. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने संविधानिक मूल्यांचा सन्मान राखणे हीच आजची सर्वात मोठी गरज आहे, असेही ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी स्पष्ट केले.