Advertisement
कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण...
मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्ह्यातील नसरापूरमध्ये चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी काल (29 जून) पुणे सत्र न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.
1 मे रोजी 65 वर्षीय नराधम भीमराव कांबळेने अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर सरकारने एसआयटी स्थापन करून प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर लगेचच या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली, अवघ्या 59 दिवसात कोर्टाने नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली. निकालानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाला कोर्टात अश्रू अनावर झाले. दरम्यान, भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर प्रत्यक्षात या नरधामाला फासावर कधी लटकवणार, असा सवाल विचारला जात आहे.
विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली. मात्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही निर्भया प्रकरणात आरोपींना सात वर्षानी तर 26/11 मधील दहशतवादी अजमल कसाब याला चार वर्षांनी फाशी देण्यात आली. हा इतिहास पाहता कांबळेच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी नेमकी कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. या फाशीला 5 ते 7 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परंतु, आरोपीचे 65 वर्षांचे वय बघता कारागृहात त्याला नैसर्गिक मृत्यू येऊ नये, याची काळजी घ्यावी लागेल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या एका विधिज्ञ यांनी सांगितले.
न्यायाधीश निकाल देताना काय म्हणाले?
- विशेष सरकारी वकिली यांनी फाशीच्या शिक्षेची मागणी करताना विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी त्यांच्या युक्तिवादाच्या समर्थनातील सर्वोच्च न्यायालयाचे 12 निकाल सादर/ जोडले आहेत.
- हे सगळे निकाल नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य असलेल आहेत आणि बऱ्याच केसेसमध्ये दोषींना फाशीची शिक्षा झाली आहे.
- काही प्रकरणांमध्ये सत्र न्यायालयाने दिलेल्या फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे आणि उच्च न्यायालयाचे निकाल पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेत रुपांतर केले आहे.
- आधीच्या प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
- गुन्ह्यातील आरोपीने दाखवलेली क्रूरता आणि त्या घटनेचा समाजावर झालेले परिणाम याची सर्वोच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा कायम ठेवताना दाखल घेण्यात आलेली आहे.
- पीडिता स्वतःच संरक्षण करू शकण्याच्या स्थितीत होती का नव्हती? तसेच हा रिअरेस्ट ऑफ रिअरेस्ट प्रमाणात मोडतो का, या सगळ्याची सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
- घटनेच्यावेळी आरोपी पीडितेसोबत होता. तो तिच्यासोबत का होता याची समाधानकारक उत्तर देण्यात आरोपी अपयशी ठरला आहे.
- याप्रकरणी सगळे बिंदू जोडण्यात तपास यंत्रणांना यश आलेले आहे.
- आता हे प्रकरण रिअरेस्ट ऑफ रेअर प्रकरणात मोडत का? हा प्रश्न आहे.
- कट रचून शांत डोक्याने केलेली हत्या गुन्ह्याची गंभीरता दर्शवत आणि त्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद असल्याच सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालांमध्ये याआधीच स्पष्ट केले आहे.
- कट रचून हत्या करण्यात आली असेल आणि त्यात क्रूरता असेल तर त्यात फाशीच्या शिक्षेची तरतुद असल्याच न्यायालयाकडून स्पष्ट.
- शांत डोक्याने केलेली हत्या त्यातील क्रूरता तसेच त्या घटनेमुळे समाजाला बसलेला धक्का असे सगळे फाशीच्या शिक्षेस पात्र असतात.
- याप्रकरणी आरोपी विरोधात सबळ पुरावे आहे. आरोपीचा गंभीर पूर्व इतिहास होता आणि टेस्ट या प्रकरणी सिद्ध होते.
- मुलीला टॉर्चर करण्यात आले आहे.
- स्वतःची हवस पूर्ण करण्यासाठी ही आरोपीने हे कृत्य केले आहे. याने समाजाला धक्का बसला आहे.
- आरोपीने तीन वर्षांच्या मुलीसोबत अमानवी कृत्य केले] त्याला भीती नव्हती. त्याचा पूर्व इतिहास होता त्याची कल्पना होती की त्याला काही होणार नाही, म्हणून तो ही कृती करायला धजावला.
- निर्भया प्रकरणानंतर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाचा कायदा करण्यात आला आहे.
- आरोपीने तीन वर्षांच्या मुलीसोबत केले कृत्य केलेले कृत्य अतिशय निर्दयी होते आणि त्यामुळे समाजमनावर गंभीर दूरगामी परिणाम झाले आहेत.
- या घटनेनंतर कुटुंबीयांचा कायद्यावरील विश्ववास उडाल्याची परिस्थिती होती त्यांनी मुंबई बंगळूरु महामार्ग रोखून धरला होता आणि आरोपीला त्यांच्या हवाली करण्याची मागणी केली, एवढी ही गंभीर घटना आहे.
- समाजामध्ये उमटलेली प्रक्रियेचा आम्ही आदर करतो. मात्र, आम्हाला कायद्यानुसार चालायला हवे.
- अनेक प्रकरणामध्ये चुकीचा तपास होतो कधी न्याय मिळण्यात होणारी दिरंगाई यामुळे समाजाच न्याय प्रक्रियेसंदर्भात चुकीचा समज होतो.
- याप्रकरणी 16 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
- उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर कोर्टाचा पूर्ण वेळ या प्रकरणाला देण्यात आला होता.
- 16 दिवसात खटला पूर्ण करण्यात आला. यादरम्यान 55 साक्षीदार तपासण्यात आले. हे सगळ्या प्रकरणामध्ये झालं पाहिजे. मात्र, ते एक स्वप्न असेल सगळ्या प्रकरणामध्ये ते शक्य नाही.
- सादर केलेल पुरावे आरोपी नेच कृत्य केल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे.
- पीडित मुलगी अवघ्या तीन वर्षांची होती.
- पोस्टमॉर्टममध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
- आरोपी फाशीच्या शिक्षेचा पात्र आहे.
- CCTV मध्ये आरोपी चित्रित झाला आहे.
- त्याच कृत्य अमानुष आहे.
- हत्येनंतर देखील त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
- त्याला फाशीची शिक्षा देखील पुरेशी नाही.
- आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा अपुरी आहेच, पण फाशीची शिक्षा देखील पुरेशी ठरणार नाही.
- याआधी 53 वर्षांचा असताना देखील आरोपीने आपल्याच कुटुंबातील एका मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा ती मुलगी अल्पवयीन होती.
- एका म्हातारीवर देखील त्याने हल्ला केला आहे. तसेच त्याने आणखीही एका महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला कोणताही पश्चात्ताप नाही. त्याने सुधारण्याची पातळी ओलांडली आहे.
- ही केस एक रिअरेस्ट ऑफ रेअर केस आहे.
- मुलीला 18 जखमा होता.
- मुलीने या दरम्यान सहन केलेल्या वेदना... जे काही
- मुलीच्या कुटुंबीयांनी सहन केले असेल याची कोर्टाला जाणीव आहे.
- याप्रकरणी पोलिसांनी उत्कृष्ट तपास केला, त्याबाबत ते अभिमानास पात्र आहेत. हे सगळ्यांसाठी एक उदाहरण आहे.
- तपासातील सगळे अभिनंदनासाठी पात्र आहेत. विशेष सरकारी वकील यांनी देखील या प्रकरणाचा सचोटीने पाठपुरावा केला आणि तात्काळ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी त्यांनी देखील खूप मेहनत घेतली.
- याप्रकरणी डॉक्टर, सायबर एक्स्पर्ट, फॉरेन्सिक तज्ञांनी देखील वाखाण्याजोगी जबाबदारी पार पाडली आणि हे एक टीम वर्कचे काम आहे.
- आरोपी फाशीच्या शिक्षेसाठी पात्र आहे.
- बलात्कार आणि हत्येप्रकरणी, पॉक्सो प्रकरणी फाशी
- निकाल ऐकताच पीडितेच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर
- आत्ता फासावर चढा न्यायाधीशांनी भीमराव कांबळेला ठणकावलं.
