#

Advertisement

Wednesday, June 17, 2026, June 17, 2026 WIB
Last Updated 2026-06-17T14:29:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

खासदार झाल्याने आर्थिक नुकसान झालं !

Advertisement

लातूरच्या खासदाराने आकडेवारीच समोर मांडली 

लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. "खासदारकीमुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे," असे उघड वक्तव्य त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात केले. सध्या, मराठवाड्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात याचीच चर्चा रंगली आहे. व्यवसायाने नेत्ररोग तज्ज्ञ असलेल्या डॉ. काळगे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना वैयक्तिक व्यवसायावर कसा परिणाम होतो, हे आकडेवारीसह मांडले आहे.
आपल्या वैद्यकीय व्यवसायाचा आणि उत्पन्नाचा आलेख मांडताना डॉ. शिवाजी काळगे यांनी दोन आर्थिक वर्षांतील आयकराची थेट तुलना केली. आर्थिक वर्ष 2023-24: खासदार होण्यापूर्वी डॉक्टर म्हणून पूर्णवेळ काम करत असताना त्यांनी सुमारे 36 लाख रुपये इतका मोठा आयकर भरला होता. आर्थिक वर्ष 2024-25 खासदार झाल्यानंतर उत्पन्न कमालीचे घटल्यामुळे त्यांना केवळ साडेआठ लाख रुपयांच्या आसपास आयकर भरावा लागला.
डॉक्टर म्हणून व्यवसाय करत असताना नियमितपणे रुग्णसेवा करता येत होती आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र, खासदार झाल्यानंतर मतदारसंघातील कामे, सततचा जनसंपर्क, विविध प्रशासकीय बैठका आणि दिल्लीतील संसदीय कामकाजामुळे वैद्यकीय व्यवसायासाठी पूर्वीइतका वेळ देणे आता अजिबात शक्य होत नाही", असं देखील डॉ. शिवाजी काळगे यांनी म्हटले आहे.
डॉ. शिवाजी काळगे यांनी लातूर आणि संपूर्ण मराठवाड्यात एक नामांकित आणि विश्वासार्ह नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून अनेक वर्षे वैद्यकीय सेवा दिली आहे. याच सामाजिक आणि वैद्यकीय कामाच्या शिदोरीवर त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघातून विजय मिळवला.
आपल्या वक्तव्यात त्यांनी पुढे स्पष्ट केले की, खासदारकी हे केवळ एक पद नसून ती जनतेने दिलेली मोठी जबाबदारी आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवणे, विकासकामांचा आणि केंद्र-राज्य शासनाच्या योजनांचा पाठपुरावा करणे यासाठी सतत उपलब्ध राहावे लागते. डॉक्टर म्हणून रुग्णांकडून मिळणारे आर्थिक उत्पन्न नक्कीच कमी झाले आहे, पण जनतेची सेवा करण्याची मिळालेली ही संधी पैशांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.