Advertisement
10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या : फौजदारी गुन्हा दाखल होणार?
सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या (विधान परिषद निवडणुकीत असाच एक खळबळजनक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला. उमेदवारी अर्जावर चक्क सूचक आणि अनुमोदकांच्या बोगस सह्या करून अर्ज दाखल केल्याचा प्रकार छाननी प्रक्रियेत उघड झाला. या भयंकर गैरप्रकारामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित उमेदवाराचा अर्ज थेट बाद केला आहे. 'न्यू राष्ट्रीय समाज पार्टी'चे अधिकृत उमेदवार अशोक वाघमोडे यांच्यावर ही नामुष्की ओढावली असून, त्यांना निवडणुकीतून अपात्र ठरविण्यात आले आहे.
सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने अशोक वाघमोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नियमानुसार, या उमेदवारी अर्जासोबत सोलापूर जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 10 लोकप्रतिनिधींची नावं सूचक आणि अनुमोदक म्हणून जोडण्यात आली होती. मात्र, निवडणूक कार्यालयात अर्जांची छाननी सुरू असतानाच या प्रकरणाला अत्यंत नाट्यमय वळण मिळालं. अर्जावर सूचक म्हणून ज्या 10 सदस्यांची नावे होती, त्यापैकी 5 सदस्यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर प्रत्यक्ष हजर राहून लेखी प्रतिज्ञापत्र सादर केलं. आम्ही उमेदवार अशोक वाघमोडे नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही, तसेच या उमेदवारी अर्जावर असलेल्या सह्या आमच्या नाहीत, असा दावा त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर केला. संबंधित उमेदवाराने निवडणूक यंत्रणेची फसवणूक करण्यासाठी आपल्या बोगस आणि बनावट सह्या केल्याचा खळबळजनक दावा करत, हा अर्ज त्वरित बाद करण्यात यावा, अशी आग्रही मागणी या सदस्यांनी केली. सूचकांनी घेतलेले गंभीर आक्षेप, प्रत्यक्ष दिलेली साक्ष आणि सादर केलेली कायदेशीर प्रतिज्ञापत्रे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तात्काळ निर्णय घेतला. त्यांनी न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे उमेदवार अशोक वाघमोडे यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक आणि कायदेशीर निकषांवर पूर्णपणे अवैध ठरवत बाद केला.
