Advertisement
पीओपी छताचा मोठा भाग कोसळला
सोलापूर : रेल्वे स्थानकातील तिकीट गृह आणि चौकशी कक्षासमोरील पीओपी छताचा मोठा भाग अचानक कोसळल्याने रेल्वे प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुदैवाने घटनेच्या वेळी मोठी गर्दी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सोलापूर रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश,कर्नाटक आणि इतर राज्यांतील हजारो प्रवाशांचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते.दररोज मोठ्या संख्येने प्रवासी या स्थानकावरून प्रवास करत असताना अशा प्रकारची घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानकावरील छत अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने डागडुजीचे काम सुरू केले असले, तरी प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोण घेणार,असा प्रश्न उपस्थित होत आहे.दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या सोलापूर रेल्वे स्थानकात जीर्ण छताची वेळेत दुरुस्ती का करण्यात आली नाही?असाही प्रश्न प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे.
