Advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चांवर ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची स्पष्ट भूमिका
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभाजनानंतर दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर या चर्चांना वेगळे राजकीय संदर्भ प्राप्त झाले. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत राजकीय अपेक्षा व्यक्त होत होत्या. मात्र, सुप्रिया सुळे, रोहित पवार, सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्याकडून या विषयावर कोणतीही ठोस चर्चा होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला उपाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील, अशी चर्चा सुरू होती. सध्या मात्र या चर्चेला काहीसा विराम मिळाल्याचे दिसते. आपण याकडे कसे पाहता?
ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारातून आणि नेतृत्वातून उभे राहिलेले एक मोठे राजकीय कुटुंब आहे. पक्षाच्या राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार आले आहेत. काही वेळा मतभेद झाले, काही वेळा राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या. मात्र या सर्व परिस्थितीकडे व्यापक राजकीय दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. आज दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत विविध चर्चा सुरू असल्या, तरी अंतिम निर्णय कोण घेणार, हे महत्त्वाचे आहे. शरद पवार साहेब जो निर्णय घेतील, तो आम्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मान्य असेल.
प्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाची शक्यता आपण नाकारत नाही?
उत्तर : राजकारणात कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र मी या विषयावर स्वतःहून कोणतीही राजकीय घोषणा किंवा अंदाज व्यक्त करणे योग्य समजत नाही. शरद पवार साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक आणि पक्षाचे संस्थापक आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे पक्षाच्या भवितव्याबाबतचा कोणताही निर्णय साहेबच योग्य वेळी घेतील. आम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहोत. साहेबांच्या निर्णयामागे ठामपणे उभे राहणे, हीच आमची भूमिका आहे.
प्रश्न : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या घटनेकडे आपण कसे पाहता?
उत्तर : अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी नेतृत्व होते. त्यांचे अकाली निधन ही अत्यंत दु:खद आणि धक्कादायक घटना ठरली, आज त्यांच्या नसण्याने जी नेतृत्वाची पोकळी तयार झाली आहे ती प्रखरतेने जाणवते. त्यांच्या राजकीय कार्याचा आणि प्रशासनातील अनुभवाचा महाराष्ट्राला मोठा लाभ झाला. अजितदादांनी आपल्या कार्यशैलीतून वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नाही. या दु:खद प्रसंगाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा प्रथम माणुसकीच्या आणि संवेदनशीलतेच्या भावनेतून पाहणे आवश्यक आहे.
प्रश्न : अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत पुन्हा अपेक्षा व्यक्त झाल्या. या चर्चेबाबत आपली भूमिका काय?
उत्तर : राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होत असतात. माध्यमे आणि राजकीय निरीक्षक आपापल्या पद्धतीने त्याचे विश्लेषण करतात. मात्र पक्षाच्या अधिकृत भूमिकेचा निर्णय पक्षाचे नेतृत्व घेते. सुनेत्राताईंच्या राजकीय जबाबदारीबाबतही आम्ही कोणतीही अनावश्यक राजकीय टिप्पणी करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत आदरणीय शरद पवार साहेब योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. साहेबांचा निर्णय हा आमच्यासाठी अंतिम आणि मान्य असेल.
प्रश्न : सध्या शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्याकडून एकत्रीकरणाबाबत कोणतीही ठोस चर्चा होताना दिसत नाही. याचा अर्थ हा विषय आता संपला आहे, असे मानायचे का?
उत्तर : तसे म्हणणे योग्य ठरणार नाही. राजकारणातील प्रत्येक चर्चा ही सार्वजनिक व्यासपीठावरच व्हावी, असे नाही. काही विषयांवर अंतर्गत पातळीवर विचारविनिमय होत असतो. अनेकदा राजकीय परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेतले जातात. त्यामुळे कोणतीही सार्वजनिक चर्चा होत नाही म्हणून एखादा विषय संपला आहे, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. मात्र पुन्हा एकदा सांगते या विषयावर अंतिम निर्णय शरद पवार साहेबच घेतील. साहेब जो निर्णय घेतील, तो आम्हा कार्यकर्त्यांना मान्य असेल.
प्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एकत्रीकरणाबाबत मोठी उत्सुकता आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमही आहे. त्यांना आपण काय सांगाल?
उत्तर : कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. राजकारणात अफवा आणि अंदाज हे नेहमीच असतात. मात्र कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. शरद पवार साहेबांनी गेल्या अनेक दशकांत महाराष्ट्राचे राजकारण घडविले आहे. त्यांनी असंख्य कार्यकर्ते घडविले आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयक्षमतेवर आम्हा सर्वांचा पूर्ण विश्वास आहे. कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा आणि पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करावे.
प्रश्न : शरद पवार साहेबांनी भविष्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना एकत्र आणण्याचा निर्णय घेतला, तर आपण तो निर्णय स्वीकाराल का?
उत्तर : याबाबत माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे. शरद पवार साहेब जो निर्णय घेतील, तो आम्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मान्य असेल. पक्षहित, महाराष्ट्रहित आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेच्या व्यापक हिताचा विचार करून साहेब निर्णय घेतील. साहेबांनी घेतलेल्या निर्णयामागे उभे राहणे, ही आमची जबाबदारी आहे. आम्ही साहेबांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवतो.
प्रश्न : काही कार्यकर्त्यांना वाटते की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनामुळे पक्षाच्या विचारांचे नुकसान झाले. आपण याबाबत काय म्हणाल?
उत्तर : कोणत्याही पक्षात मतभेद किंवा राजकीय आव्हाने निर्माण होऊ शकतात. मात्र विचारधारा आणि संघटन ही दीर्घकाळ टिकणारी असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने भूमिका घेतली आहे. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा हा विचार पुढे नेण्याचे काम आम्ही करीत आहोत. व्यक्ती येतात आणि जातात; पण विचार आणि संघटन टिकते. त्यामुळे आम्ही पक्षाची विचारधारा आणि संघटन मजबूत करण्यावर भर देत आहोत.
प्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत आपण काय सांगाल?
उत्तर : राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य हे एका व्यक्तीपुरते मर्यादित नाही. शरद पवार साहेबांनी अनेक पिढ्यांचे नेतृत्व घडविले आहे. आदरणीय माझे वडील लक्ष्मणराव ढोबळे या जुन्या पिढीसह नवीन नेतृत्त्वामध्ये सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह अनेक तरुण नेते पक्षात काम करीत आहेत. पक्षात मोठी कार्यकर्त्यांची फळी आहे. मात्र नेतृत्वाबाबतचा अंतिम निर्णय आणि दिशा आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच निश्चित होईल. आम्हाला साहेबांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे.
प्रश्न : आपल्या राजकीय भूमिकेचा थोडक्यात सारांश काय सांगाल?
उत्तर : माझी भूमिका अतिशय स्पष्ट आहे. आदरणीय शरद पवार साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला आहे. पक्षाच्या भवितव्याबाबत साहेब जो निर्णय घेतील, तो आम्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मान्य असेल. राजकारणात वैयक्तिक मतांपेक्षा पक्षाचे नेतृत्व आणि पक्षहित महत्त्वाचे असते. त्यामुळे साहेबांच्या निर्णयावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
प्रश्न : शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आपला संदेश काय?
उत्तर : कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, पक्ष संघटना मजबूत करावी आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा. राजकीय परिस्थिती बदलत राहते. मात्र साहेबांचे नेतृत्व आणि त्यांचा विचार महाराष्ट्रासाठी कायम महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करावे. साहेब जो निर्णय घेतील, तो आम्ही सर्वजण स्वीकारू आणि त्या निर्णयामागे ठामपणे उभे राहू.
