#

Advertisement

Monday, July 20, 2026, July 20, 2026 WIB
Last Updated 2026-07-20T13:02:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लक्ष्मण हाके यांनी केली ‘ओबीसी जनता पार्टी’ स्थापन

Advertisement

सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढा देण्यासाठी पक्ष उभारल्याचे केले स्पष्ट  

बारामती : ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर राज्य सरकार आणि भारतीय जनता पक्षावर टीका करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी स्वतंत्र ‘ओबीसी जनता पार्टी’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ओबीसींच्या हक्कांसाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढा देण्यासाठी हा पक्ष उभारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नव्या पक्षाच्या भूमिकेबाबत बोलताना हाके म्हणाले, “कोणाला आमदार, मंत्री, मुख्यमंत्री किंवा खासदार बनवण्यासाठी हा पक्ष स्थापन केलेला नाही. सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी ‘ओबीसी जनता पार्टी’ची स्थापना करण्यात आली आहे. कोणाचे लाड पुरवण्यासाठी हा पक्ष अजिबात नाही.”
राज्यभर संघटनात्मक बांधणी करून ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी अधिक तीव्र लढा उभारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लक्ष्मण हाके यांच्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, आगामी काळात ‘ओबीसी जनता पार्टी’चा प्रभाव किती वाढतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बारामती येथे माध्यमांशी संवाद साधताना हाके यांनी आरोप केला की, भारतीय जनता पक्ष विरोधी आवाज दडपण्याचे काम करत आहे. “लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असे ते म्हणाले. ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी ओबीसी महामंडळांना पुरेसा निधी मिळत नसल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजनांनाही आवश्यक आर्थिक तरतूद होत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून, “ओबीसी महामंडळांना निधी कधी देणार? विद्यार्थ्यांच्या योजनांसाठी आर्थिक तरतूद कधी करणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.