Advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळंच केले स्पष्ट
मुंबई : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरनंतर नंतर आता महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष भविष्यात NDA सोबत जाण्यासंदर्भात पक्षांतर्गत चर्चा सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी SPच्या ज्येष्ठ नेत्यावर जबाबदारी देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळं राज्यातील राजकारणात आणखी एक उलथापालथ होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे यांच्यात मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडल्याचं बोललं जातंय. या बैठकीत NDA ला पाठिंबा देण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळं पवारांची राष्ट्रवादी राष्ट्रवादी SPची NDAसोबत जाण्याची चाचपणी करते का? अशी चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सध्या 8 खासदार आणि 10 आमदारांची ताकद आहे. त्यामुळं ही ताकद सत्तेसोबत जोडायची की काँग्रेससोबत विरोधी पक्षातच राहायचं? याबाबत पवारांच्या राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलेलं. पण, आता पवारांशी पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यावर खासदार आणि आमदारांशी चर्चा आणि चाचपणी करण्याची जबाबदारी सोपवल्याची माहिती मिळतेय. त्यामुळं शरद पवारांचती राष्ट्रवादी पक्ष NDAला थेट पाठिंबा देणार की बाहेरुन मदत करणार याची चाचपणी सुरू झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत असून, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे वृत्त नाकारलं आहे. NDAमध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही असं सांगत त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. "महाराष्ट्रातून NDA मध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील. कोणताही नवीन पक्ष एनडीएत येण्याची चर्चा नाही," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. आम्ही सोबतच्या कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाहीत. पवारांच्या पक्षातील आमदार, खासदार कोणालाही फोडण्याचा आमचा प्रयत्न नाही असंही ते म्हणाले आहेत.
