Advertisement
पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर विशेष भर
पुणे : महाराष्ट्रातील आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फिल्डिंग लावली असून मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (MMR) पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक यंत्रणा अधिक गतिमान व पर्यावरणपूरक बनवण्यासाठी सर्व मेट्रो मार्गिकांची कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला दिले आहेत.कामातील विलंबा मुळे वाढणारा आर्थिक खर्च टाळण्यासाठी कोणताही मेट्रो प्रकल्प सुरू झाल्यापासून अवघ्या ३ वर्षांत पूर्ण झाला पाहिजे, असा कडक इशारा मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या ‘मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या’ बैठकीत त्यांनी हा महत्त्वाचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये मिरा गाव ते गायमुख या ‘मेट्रो-10’ प्रकल्पाच्या प्रगतीवर चर्चा झाली. सुमारे 9.68 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 8500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, यामध्ये 5 उन्नत (एलिव्हेटेड) स्थानकांचा समावेश असणार आहे.
आगामी निवडणुकीत मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक समस्या व विकासकामे हा मुख्य विषय ठरणार आहे. महायुती सरकार विकासाला आणि नागरिकांच्या सोयीला प्राधान्य देत असल्याचे दाखवून देण्यासाठी मेट्रो जाळ्याचा वेगाने होणारा विस्तार हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. एमएमआरडीए क्षेत्रातील या मेट्रो मार्गिका वेळेत पूर्ण करून 2029 च्या निवडणुकीपूर्वी प्रवाशांना मोठा दिलासा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे.
