#

Advertisement

Wednesday, August 5, 2026, August 05, 2026 WIB
Last Updated 2026-08-05T16:07:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आईला 'गुंगी गुडीया' म्हटल्यानंतर जय पवारांची पोस्ट चर्चेत

Advertisement

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा 'गुंगी गुडीया' असा उल्लेख करत काँग्रेसने केलेल्या वादग्रस्त ट्विटनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यावेळी सुनेत्रा पवार यांचे  पुत्र जय पवार यांनी याविरोधात जोरदार आवाज उठवला आहे. माझ्या आईचा 'गुंगी गुडीया' म्हणून केलेला अपमान हा केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून स्वतःच्या कर्तृत्वावर उभ्या राहणाऱ्या प्रत्येक महिलेच्या स्वाभिमानावर झालेला आघात आहे, अशा अत्यंत कडक आणि भावूक शब्दांत जय पवार यांनी काँग्रेसला सुनावले आहे.

जय पवार यांनी त्यांची पोस्टमध्ये राजकीय संस्कृतीवर भाष्य करत काँग्रेसच्या भाषेवर कडक शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. लोकशाहीत राजकीय मतभेद आणि धोरणांवर टीका होणे स्वाभाविक असले, तरी महिलांची प्रतिष्ठा कमी करणारी भाषा कोणत्याही सुसंस्कृत समाजात स्वीकारली जाऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राजकारण हे कामगिरीचे आणि जनतेच्या विश्वासाचे असावे, असा टोला लगावतानाच आज मी केवळ एका आईच्या पाठीशी नाही, तर देशातील प्रत्येक कर्तृत्ववान महिलेच्या सन्मानासाठी ठामपणे उभा आहे, असा  इशाराही त्यांनी दिला आहे.


काय आहे जय पवार यांची संपूर्ण इन्स्टाग्राम पोस्ट?
माननीय सुनेत्रा पवार यांच्याबाबत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या नेत्यांनी वापरलेली भाषा ही केवळ एका व्यक्तीवर केलेली टीका नसून, निष्ठा, कठोर परिश्रम, जनसेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर समाजात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सन्मानावर झालेला थेट आणि निषेधार्ह आघात आहे.
माननीय सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. राजकीय मतभेद असू शकतात; परंतु महिलांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्त्वाला कमी लेखणारी अथवा त्यांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीत कधीही स्वीकारली जाऊ शकत नाही. राजकारण हे विचारांचे, धोरणांचे, कामगिरीचे आणि जनतेच्या विश्वासाचे असते महिलांचा अवमान करणाऱ्या शब्दांचे नव्हे. मतभेद जरूर असावेत; पण ते तथ्य, सभ्यता, संयम आणि लोकशाही मूल्यांच्या चौकटीतच व्यक्त झाले पाहिजेत. आज मी केवळ माझ्या आईच्या पाठीशी उभा नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या भारतातील प्रत्येक महिलेच्या सन्मानाच्या रक्षणासाठी ठामपणे उभा आहे. तिची राजकीय विचारधारा कोणतीही असो, तिचा सन्मान हा अबाधित आणि निर्विवाद राहिलाच पाहिजे.