#

Advertisement

Wednesday, August 5, 2026, August 05, 2026 WIB
Last Updated 2026-08-05T13:15:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादीला मिळाल्या नवीन महिला प्रदेशाध्यक्षा

Advertisement

वैशाली नागवडे यांच्याकडे यांच्याकडे पदाची जबाबदारी 

पुणे : मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातील अंतर्गत पद नियुक्तीचा प्रश्न अखेर सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला. त्यानंतर रिक्त असलेल्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आता वैशाली नागवडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
वैशाली नागवडे या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील आहेत. 1999 मध्ये संगणक संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डेटा एन्ट्रीच्या कामादरम्यान त्यांची दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट झाली. त्यानंतर अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास सुरू झाला. संघटनेतील प्रदीर्घ अनुभव, प्रशासकीय कामांची जाण आणि आक्रमक वक्तृत्व यामुळे पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय वर्तुळातून आणि पुणे जिल्ह्यातून आनंद व्यक्त केला जात आहे.त्यांच्याबरोबर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने ही महत्त्वाची संघटनात्मक फेररचना केली आहे.
काही महिन्यांपूर्वी एका वादग्रस्त प्रकरणातील आरोपीसोबत नाव जोडले गेल्यामुळे झालेल्या टीकेनंतर रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून रिक्त असलेल्या या पदावर आता वैशाली नागवडे यांची वर्णी लागली आहे.


वैशाली नागवडे यांचा राजकीय व प्रशासकीय प्रवास:

2002: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती.

2005 व 2010 : ‘महानंदा’ (महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ) च्या संचालकपदी निवड.

2007 : दौंड पंचायत समितीच्या सदस्य म्हणून विजय.

2009 : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा महिला अध्यक्षपद तसेच ‘महाराष्ट्र पंचायत राज महिला समिती’चे अध्यक्षपद.

2013 : ‘महानंदा’च्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्ष; तसेच उत्तर प्रदेशातील ‘IVRI’ च्या संचालकपदी नियुक्ती.

2014: गुजरातमधील ‘NDDB’ च्या संचालकपदी निवड.

2024: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य प्रवक्तेपदी नियुक्ती.