#

Advertisement

Wednesday, August 5, 2026, August 05, 2026 WIB
Last Updated 2026-08-05T12:11:37Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुनेत्रा पवार यांच्यावरील अवमानकारक पोस्टचा निषेध

Advertisement


काँग्रेसने जाहीर माफी मागावी : ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या अधिकृत एक्स (ट्विटर) खात्यावरून करण्यात आलेल्या कथित अवमानकारक पोस्टचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महिलांबाबत अशा प्रकारची भाषा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसून, काँग्रेस इतिहास विसरली आहे का, असा सवाल करीत या प्रकरणी काँग्रेसने तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ॲड. साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून करण्यात आलेली पोस्ट ही राजकीय सभ्यतेला न शोभणारी असून, ती वैचारिक दिवाळखोरीचे दर्शन घडवणारी आहे. लोकशाहीत मतभेद असू शकतात, राजकीय संघर्षही होऊ शकतो; मात्र महिलांचा अवमान करणारी भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला छेद देणारी बाब आहे.
शिवछत्रपती, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात राजकारण हे विचारांच्या आधारे व्हायला हवे. विचारांना विचारांनी आणि मुद्द्यांना मुद्द्यांनी उत्तर देणे हीच खरी लोकशाहीची परंपरा आहे. वैयक्तिक पातळीवर घसरून महिलांबाबत अवमानकारक भाषा वापरणे कोणत्याही पक्षाला शोभणारे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय मतभेद असले तरी महिलांचा सन्मान राखणे ही सर्व पक्षांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे संबंधित पोस्टबाबत काँग्रेसने तातडीने जाहीर माफी मागून भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केली.