Advertisement
अभिजित दिपके यांच्या घरी जाऊन भेट घेणे शिरसाटांच्या अंगलट
पुणे : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘CJP’ संघटनेचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणे शिरसाट यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या भेटीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.आता त्यांच्या मंत्रिपदावर टागंती तलवार आली आहे.
मंत्री शिरसाट यांच्या या भेटीवर बोलताना भाजप नेत्यांनी सरकारविरुद्ध भूमिका घेणाऱ्या आंदोलकाच्या निवासस्थानी मंत्र्याने जाणे अयोग्य असून, यामुळे महायुतीच्या एकतेला धक्का पोहोचत असल्याची भावना व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे. संजय शिरसाट वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही विविध कारणांमुळे ते अडचणीत आले आहेत. या सर्व घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांच्या कामगिरीवर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. ही संधी साधत ठाकरे गटाने शिंदे गटातील अंतर्गत वादावर निशाणा साधला आहे. दरम्यान, शिरसाट यांनी सर्व आरोप व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
शिरसाट यांच्याभोवती असलेले प्रमुख वाद:
‘विट्स हॉटेल’च्या लिलाव प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. ट्रक टर्मिनसची जमीन आपल्या मुलाच्या नावे केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील वर्ग-2 ची जमीन नियमांना डावलून खरेदी केल्याचा दावाही केला गेला. जालन्यावरील मोक्याची जमीन अतिशय अल्प दरात लाटल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. खाटाखाली पैशांची बॅग असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
