Advertisement
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती आघाडीच्या नेतृत्वात मोठा बदल करण्यात आला असून, पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या विद्यमान युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांच्या जागी आता निर्मला नवले यांच्याकडे ही महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. देवगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते निर्मला नवले यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले.
निर्मला नवले यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगावचे सरपंचपद भूषवले आहे. स्थानिक पातळीवर, विशेषतः ग्रामीण भागात त्यांनी तरुण आणि महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी मोठे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची आणि पक्ष संघटनेतील सक्रियतेची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर युवती प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
या नवीन नियुक्तीमुळे पक्षाच्या युवती आघाडीला अधिक ऊर्जा मिळेल आणि आगामी काळात राज्यातील तरुणींचे प्रश्न आक्रमकपणे मांडले जातील, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
कोण आहेत निर्मला नवले?
उच्च शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या निर्मला शुभम नवले यांनी 2021 मध्ये वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी सार्वजनिक जीवनात प्रवेश करत एक वेगळा ठसा उमटवला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या कारेगावच्या सरपंचपदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोहोचला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक प्रशासन आणि लोकाभिमुख उपक्रमांच्या जोरावर त्यांनी ग्रामविकासाचा एक नवा पॅटर्न तयार केला आहे.
अभियांत्रिकी पदवी (B.E. IT) प्राप्त केलेल्या निर्मला नवले यांनी 2021 मध्ये कारेगावच्या सरपंचपदाची सूत्रे हाती घेतली. आयटी इंजिनिअर असलेल्या निर्मला नवले यांनी गावातील रस्ते, पाणी, वीज आणि स्वच्छता या मूलभूत गरजांसोबतच ग्रामविकासात आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातली. ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार त्यांच्या कार्यकाळात सुमारे 72 कोटी रुपयांची विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
