#

Advertisement

Tuesday, August 18, 2026, August 18, 2026 WIB
Last Updated 2026-08-18T12:32:51Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शाहू शिक्षण संस्थेची शिक्षक भरती जाहिरात ‘पवित्र’वरून हटवली

Advertisement

 

संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांचीच मागणी ;
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण खात्याची दिशाभूल केल्याचा आरोप 

पंढरपूर : शाहू शिक्षण संस्था, पंढरपूरच्या विविध शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण खात्याची दिशाभूल करून भरती जाहिरातीस मंजुरी मिळविल्याचा गंभीर आरोप संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मण कोंडीबा ढोबळे यांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवरून हटविण्यात आल्याची माहिती त्यांनी जाहीर प्रसिद्धीकरणाद्वारे दिली आहे.
शाहू शिक्षण संस्थेच्या विविध शाळा व शैक्षणिक प्रकल्पांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, संस्थेचे सचिव आणि अध्यक्षपदाशी संबंधित न्यायालयीन व धर्मादाय प्रकरणांची माहिती शिक्षण विभागापासून लपवून ही मंजुरी मिळविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ढोबळे यांनी केलेल्या दाव्यानुसार, संस्थेच्या सचिव पदाला धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांची स्थगिती आहे. तसेच अध्यक्षपदासाठी तात्पुरती मंजुरी मिळावी म्हणून करण्यात आलेला अर्ज धर्मादाय उपआयुक्त, सोलापूर यांनी फेटाळला होता. या बाबी शिक्षण विभागापासून लपविण्यात आल्याने भरती जाहिरातीस मंजुरी मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, १० ऑगस्ट २०२६ रोजी दैनिक लोकमतमध्ये शाहू शिक्षण संस्थेच्या नावाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांमध्ये भरती प्रक्रियेबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधून संबंधित न्यायालयीन प्रकरणांची माहिती सादर केली.
या तक्रारीची दखल घेत शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, सोलापूर यांनी संबंधित जाहिरात पवित्र पोर्टलवरून तातडीने हटविण्याची शिफारस व सूचना शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग यांच्याकडे केली. त्यानंतर ही जाहिरात पवित्र पोर्टलवरून काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित आरोपांबाबत संस्थेतील अन्य पदाधिकारी अथवा संबंधित व्यक्तींची अधिकृत बाजू समोर आलेली नाही.

उमेदवारांना सावधानतेचा इशारा
या पार्श्वभूमीवर संस्थेचे अध्यक्ष ढोबळे यांनी उमेदवारांना स्पष्ट सावधानतेचा इशारा दिला आहे. दैनिकातील संबंधित जाहिरातीच्या आधारे कोणत्याही उमेदवाराने शिक्षक किंवा शिक्षकेतर पदासाठी अर्ज करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रक्रियेतून उमेदवारी करून नोकरी मिळाल्यास त्या नियुक्तीस वैयक्तिक मान्यता मिळणार नसल्याचा दावाही प्रसिद्धीकरणात करण्यात आला आहे.
नोकरीच्या आशेने अर्ज करणाऱ्या बेरोजगार युवक-युवतींची संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी हे जाहीर प्रसिद्धीकरण करण्यात येत असल्याचे ढोबळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे शाहू शिक्षण संस्थेतील भरती प्रक्रिया, संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या अधिकाराचा प्रश्न आणि शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या जाहिरात मंजुरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.