#

Advertisement

Tuesday, August 11, 2026, August 11, 2026 WIB
Last Updated 2026-08-11T14:12:37Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादीच्या ८ खासदारांचं मोदींसोबत २५ मिनिटं खलबतं!

Advertisement

 

एका बाजूला सत्ताधारी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा, तर दुसऱ्या बाजूला बंद दाराआड बैठक

दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपप्रणीत एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी सोमवारी (१० ऑगस्ट) दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीत पक्षाचे आठ खासदार सहभागी झाले होते. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत खासदारांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडल्याची माहिती आहे. काही मतदारसंघांमध्ये निर्माण झालेली पूरस्थिती, पावसाचा अभाव, पिकांना मिळणाऱ्या किमती तसेच विविध विकासकामांशी संबंधित प्रश्नांवर यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
खासदारांनी मांडलेल्या समस्या पंतप्रधानांनी ऐकून घेतल्या असून, त्या सोडवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या खासदारांनी महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, कवी अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणीही केली.
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची थेट पंतप्रधानांसोबत झालेली भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या राजकीय हालचाली आणि त्यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याच्या चर्चाही सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादीच्या खासदारांची भेट झाल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. मात्र, बैठकीत केवळ मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा झाली की त्यामागे कोणती राजकीय चर्चा होती, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित विधेयक पुन्हा आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमध्ये हालचाली वाढल्या असून, शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या यापूर्वीच्या भेटींचीही राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदारांची ताजी भेट आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने किती महत्त्वाची ठरते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.