Advertisement
पेपरफुटीच्या लव्हस्टोरीने यंत्रणा चक्रावली!
मुंबई : अन्न,औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द (FDA Drug Inspector Group-B Exam) करण्याचा निर्णय आयोगानं घेतला आहे. 22 मार्च 2026 च्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचं आणि त्याचा लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालं आहे. त्यामुळे आयोगानं ही भरती प्रक्रिया रद्द केली असून आता फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नसून फेरपरीक्षेसाठी कोणतंच शुल्क आकारलं जाणार नाही. फेरपरीक्षेची तारीख स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, प्रेमप्रकरणातून MPSC चा पेपर फुटल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती समोर आली आहे.
एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीच्या घटनेतील घटनाक्रम थक्क करणारा आहे. या संपूर्ण प्रकाराला एक लव्ह स्टोरी कारणीभूत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रियकराने एमपीएससीमध्ये अगदी एका खालच्या कर्मचाऱ्याशी संधान साधून हा प्रकार केल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे फुटलेला पेपर केवळ एकालाच मिळाला, अशीही माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.
एमपीएससी परीक्षेची प्रक्रिया अनेक महिने चालू असते. त्यामुळे या परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया विद्यमान अध्यक्ष रुजू होण्यापूर्वीच पूर्ण झाली होती. केवळ एकच विद्यार्थ्याकडे पेपर मिळाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष असला तरी आयोगाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ एकाकडेच पेपर गेला असतानाही इतर सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे.
22 मार्च, 2026 रोजी ही चाळणी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने राज्यातील 6 विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. सदर परीक्षेचा दिनांक 12 जून, 2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. चाळणी परीक्षेअंती मुलाखतीकरिता 506 इतके उमेदवार पात्र ठरले. यापैकी 488 उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 01 जुलै, 2026 ते 22 जुलै 2026 या कालावधीत घेण्यात आल्या. दिनांक 22 जुलै,2026 रोजी सायंकाळी मुलाखती संपल्यानंतर औषध निरीक्षक पदाकरिता पात्र ठरणाऱ्या 485 व अपात्र 03 अशा एकूण 488 उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन या संवर्गाच्या उपरोक्त जाहिरातीतील पदांसाठी आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.याकरिता संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही.तसेच त्याकरिता कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. फेरपरीक्षेसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
