Advertisement
मराठा बांधवांची थेट गाडीखाली उडी
सोलापूर : अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. जरांगे पाटलांची तब्येत खालावत असल्याने राज्यभरात मराठा बांधव आक्रमक होत असून आज धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातही मराठा बांधवांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेगळ्या आंदोलनाचा प्रयत्न केला. धाराशिव मध्ये मराठा बांधव सामाजिक न्याय विभागाच्या उंच इमारतीवर चढले होते. तर, सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा ताफा अडवत मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
माढा तालुक्यातील टेभुर्णी येथे चार ते पाच मराठा आंदोलकांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांची गाडी अडवून थेट गाडी समोर येऊन गाडी खाली घुसण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी, पालकमंत्री जयकुमार गोरेसमवेत माढ्याचे माजी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देखील गाडीत होते. माजी आमदार बबनराव शिंदेच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी जात असताना मराठा आंदोलकांनी मंत्र्यांचा ताफा अडवत हे आंदोलन केलंय. एक मराठा लाख मराठासह मनोज जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करुन गाडी समोर आडवे झोपून गाडी खाली घुसण्याचा प्रयत्न झालाय. या घटनेनंतर जिल्ह्यातील मराठा बांधवात चर्चा सुरू झाली असून पोलीसही सतर्क आहेत. दरम्यान, सोलापुरात पोलिसांनी मंत्र्यांच्या कारसमोर आलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्यानंतर पालकमंत्र्यांचा ताफा पुढे रवाना झाला.
माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जाताना जयकुमार गोरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर, ते कार्यक्रमस्थळी पोहोचले, यावेळी व्यासपीठावर बसले असता सहाय्यक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्याशी त्यांनी चर्चा केली. ताफा अडवल्यानंतर जयकुमार गोरे अलर्ट मोडवर असल्याचं दिसून आलं, तत्काळ सहाय्यक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्याशी त्यांनी चर्चा कली.
