#

Advertisement

Tuesday, September 29, 2026, September 29, 2026 WIB
Last Updated 2026-09-29T15:22:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

MPSC च्या परिक्षा पुन्हा पुढे ढकलल्या

Advertisement

 

राज्यसेवा मुख्य परीक्षेसह तीन महत्त्वाच्या परीक्षांना अचानक स्थगिती

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ३ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत ही परीक्षा होणार होती. मात्र, आता परीक्षेला स्थगिती देण्यात आली असून सुधारित वेळापत्रक पुढील काही दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेसोबत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२६ आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा २०२६ यांनाही स्थगिती देण्यात आली आहे. या तिन्ही परीक्षांच्या नवीन तारखा आयोगाकडून नंतर जाहीर केल्या जाणार आहेत. दरम्यान, पेपर फुटीच्या प्रकरणानंतर आगामी परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उमेदवारांकडून उपस्थित करण्यात आला होता. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका नव्याने तयार कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. गरज भासल्यास परीक्षा पुढे ढकलण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, सध्या तयार असलेल्या प्रश्नपत्रिका रद्द करून नव्याने प्रश्नपत्रिका तयार केल्या जाणार आहेत का, याबाबत आयोगाकडून अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतरही प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम कायम आहे. याशिवाय, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनावर काही विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतले होते. या आक्षेपांची दखल घेत आयोगाने उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतींचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. त्यामुळे आगामी काळात स्पर्धा परीक्षांच्या प्रक्रियेत कोणते बदल होतात, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.