Advertisement
बीड : सक्रिय राजकारणापासून गेल्या काही महिन्यांपासून काहीसे बाजूला सारले गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत धनंजय मुंडे हे जीममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राजकारणापासून अलिप्त असल्याने सध्या धनंजय मुंडे हे स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत आहेत. याचाच एक भाग म्हणून ते जीममध्ये जाऊन घाम गाळत आहेत. यामुळे धनंजय मुंडे यांच्यात कमालीचे ट्रान्सर्फोमेशन दिसून येत आहे. यापूर्वीही धनंजय मुंडे हे तसे फिट राहण्याकडे भर देत होते. मात्र, धनंजय मुंडे यांचा हा नवा लूक त्यापेक्षाही चर्चेचा विषय ठरत आहे.
धनंजय मुंडे यांनी जीममधील हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये कवितेच्या काही ओळी लिहल्या आहेत. काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे… भेगाळलेले पाय आणि घायाळ मन; अजूनही धैर्य टिकवून आहे… निंदा-दूषणे आता न भिडती, अडखळत मार्ग काढतोच आहे… हरवण्याची आता बिशाद कुणाची… स्वतःशी सुद्धा लढतो आहे…, असे धनंजय मुंडे यांनी इन्स्टा पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 2024 साली विधानसभा निवडणुकीनंतर निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी असलेल्या वाल्मिक कराड याचे नाव समोर आले होते. यावरुन धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली होती. यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्याविषयी अनेकदा चर्चा झाल्या होत्या. परंतु, या चर्चा कधीच प्रत्यक्षात आल्या नाहीत. अलीकडेच धनंजय मुंडे यांनी राजकारणात पुनरागमन करण्याचे संकेत दिले होते. मात्र, पालकमंत्री सुनेत्रा पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असताना त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलून न देता स्वत:च पत्रकारांना त्या बोलणार नाहीत, असे सांगितल्यामुळे धनंजय मुंडे वादात सापडले होते. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांचे कानही टोचले होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे राजकीय पुनरागमन आणखीनच लांबणीवर पडल्याचे सांगितले जाते. बऱ्याच काळानंतर सक्रिय झालेल्या मुंडे यांनी ही पोस्ट टाकून आपण सर्व आरोप, टीका आणि अडचणींनंतरही खचलेलो नाही, लढत राहणार असल्याचा संदेश दिला आहे.
https://www.instagram.com/explore/tags/NeverGiveUp/?utm_source=ig_embed
