#

Advertisement

Friday, October 2, 2026, October 02, 2026 WIB
Last Updated 2026-10-02T14:52:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पुणे-पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता वाढली

Advertisement

ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी पाणीकपातीची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन लक्षात घेता, शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने १० टक्के पाणीकपात करण्याच्या उपाययोजनेवर राज्य सरकारकडून विचार सुरू आहे. धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा पुढील वर्षी ऑगस्ट २०२७पर्यंत पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देण्यात आल्या आहेत.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत शहरांसह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यावर चर्चा झाली. त्यानुसार टप्प्याटप्प्याने १० टक्के पाणीकपात करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, कोणत्या शहरात किती कपात करायची आणि ती कधीपासून लागू करायची, याचा अंतिम निर्णय संबंधित भागातील पाणीसाठा, भौगोलिक परिस्थिती आणि पाणीटंचाईची तीव्रता पाहून घेतला जाणार आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता आगामी काळात काही भागांत पाणीकपात करावी लागू शकते, असे स्पष्ट केले आहे. मात्र, कपातीचे प्रमाण आणि अंमलबजावणीची पद्धत अद्याप निश्चित झालेली नाही. मंत्रिमंडळ उपसमितीच्या पुढील बैठकीत याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपात लागू झाल्यास त्याचा दैनंदिन पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, नागरिकांना नेमका किती वेळ पाणी मिळणार, कोणत्या भागात किती कपात होणार आणि कपात कधीपासून सुरू होणार, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे. त्यामुळे पुढील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.