#

Advertisement

Friday, October 2, 2026, October 02, 2026 WIB
Last Updated 2026-10-02T14:57:00Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून निवडणूक आयोग वादात

Advertisement

पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघाची आगामी निवडणूक जाहीर होताच मतदार याद्यांमधील मोठ्या घोळामुळे नवीन वाद समोर आला आहे. सातारा जिल्ह्याशी संबंधित एका नोंदीमध्ये मतदाराचे नाव ‘प्रशांत दादासाहेबांचे बॉम्बस्फोट’ आणि वडिलांचे नाव ‘दादासाहेबांचा बॉम्ब’ असे छापून आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या अजब आणि गंभीर चुकीमुळे निवडणूक प्रक्रियेच्या गांभीर्यावर आणि पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत शिक्षक निवडणुकीतील काही इच्छुक उमेदवारांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मतदार यादीतील ही अनागोंदी आणि चुकीच्या नोंदी तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिक्षक मतदारसंघासाठी मतदारांची अर्हता आणि एकूण संख्या अत्यंत मर्यादित असते. अशा स्थितीत इतकी निष्काळजीपणाची नोंद मतदार यादीत कशी समाविष्ट झाली, असा सवाल आता विचारला जात आहे.
याशिवाय, अवघ्या 4 दिवसांत मतदार नोंदणी प्रक्रिया घाईघाईने बंद करण्यात आल्याने विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर लगेचच नोंदणी थांबवण्यात आली. तसेच, गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत या मतदारसंघातील मतदारांची संख्या 32 हजारांवरून थेट 12 हजारांवर खाली आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आधीच एसआयआर प्रक्रियेवरून राज्यभरात वाद सुरू असताना, आता या नव्या प्रकरणामुळे निवडणूक आयोग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लवकरच विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील 5 जागांसाठी मतदान होणार आहे, मात्र त्याआधीच पुणे मतदारसंघातील या घटनेमुळे वातावरणात मोठा तणाव निर्माण झाला आहे.