Advertisement
राष्ट्रवादीच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांचा सवाल
सोलापूर : पुणे आणि सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून अल्पवयीन मुली आणि महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, ही राज्यासाठी अत्यंत चिंताजनक बाब बनली आहे. लाडक्या बहिणींच्या जीवावर सत्तेवर आलेल्या सरकारला आज महिलांच्या सुरक्षेबाबत कोणतेही सोयरसुतक उरलेले नाही. भरदिवसा मुली बेपत्ता होत असताना राज्याचे गृह खाते झोपा काढते काय? पोलीस नक्की कुणाची सुरक्षा करण्यात गुंतले आहेत? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष अॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी उपस्थित केला आहे.
वृत्तपत्रांमध्ये आणि शासकीय अहवालांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, २०२५ या एकाच वर्षात राज्यात तब्बल ४८ हजार २७८ महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. यापूर्वी २०२४ मध्ये हीच संख्या ४५ हजार ६६२ एवढी होती. तर २०२४ आणि २०२५ या दोन वर्षाच्या कालावधीत अनुक्रमे ११ हजार ३१६ आणि १२ हजार ११३ इतक्या मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुली हरविल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
शासनाच्या दाव्यानुसार, यंत्रणेने यातील बहुतांश महिला व मुलींचा शोध घेतला असला, तरी आजही शेकडो-हजारो कुटुंबे आपल्या मुलींच्या परतीच्या प्रतीक्षेत आहेत. २०२५ मधील आकडेवारी पाहिल्यास, हजारो महिला व मुली अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध लागलेला नाही. विशेषतः पुणे, सोलापूर, मुंबई आणि इतर प्रमुख शहरांमध्ये अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होणे आणि मानवी तस्करीच्या जाळ्यात ओढले जाणे यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सोलापूर शहरातून एकाच वेळी तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राज्याच्या गृह मंत्रालयाचे या गंभीर प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. महिला व मुलींचे रक्षण करण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, गृह खाते असूनही ते मृतावस्थेत असल्यासारखे आहे. म्हणूनच राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी आणि सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेचा विश्वास निर्माण करण्यासाठी गृह खात्याची तातडीने पुनर्स्थापना करावी, अशी आक्रमक मागणी अॅड. कोमल साळुंखे यांनी केली आहे.
