Advertisement
अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; पोलीस प्रशासनाला इशारा
मंगळवेढा : प्लॉटच्या वादातून महिलेला मंगळवेढा नगरपालिकेत बोलावून जमावाकडून मारहाण केल्याच्या आरोपानंतर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर आता कथित ॲट्रॉसिटी गुन्ह्याच्या निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. हा गुन्हा खोटा असल्याचा आरोप करत, संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करावी, अन्यथा ३ ऑक्टोबर २०२६ पासून संपूर्ण मंगळवेढा तालुका बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा समस्त मंगळवेढेकर नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत मंगळवेढा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना नागरिकांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले. सध्या दाखल झालेल्या कथित ॲट्रॉसिटी गुन्ह्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी आणि असंतोष निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय, वस्तुनिष्ठ पद्धतीने करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, नगरपालिकेच्या आवारात महिलेला मारहाण झाल्याच्या आरोपावरून नगरसेवक प्रवीण खवतोडे यांच्यासह १२ जणांविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण, शिवीगाळ, साडी ओढणे तसेच सोन्याचे मिनी गंठण तोडून नेल्याचे आरोप फिर्यादीकडून करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर आता ॲट्रॉसिटी कायद्याच्या कथित गैरवापराबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तपासाअंती संबंधित गुन्हा खोटा असल्याचे निष्पन्न झाल्यास तो कायदेशीर प्रक्रियेनुसार रद्द करण्यात यावा आणि कायद्याचा जाणीवपूर्वक गैरवापर झाल्याचे आढळल्यास संबंधितांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांची पोलिस तपासातून वस्तुस्थिती स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवतीर्थावर सर्वसमाजाची बैठक :
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर समस्त मंगळवेढेकरांच्या वतीने शिवतीर्थ येथे सायंकाळी सात वाजता सर्व समाजातील नागरिकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत विविध समाजघटकांतील नागरिकांनी आपापल्या भूमिका मांडत, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्याची मागणी केली. या बैठकीत अन्याय झाल्याचा आरोप करत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. प्रशासनाने नागरिकांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रस्तावित आंदोलन शांततामय आणि कायदेशीर मार्गाने करण्यात येईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
