#

Advertisement

Thursday, November 26, 2026, November 26, 2026 WIB
Last Updated 2026-11-26T08:57:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

MPSC पदभरतीपूर्वी अनुसूचित जातींचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण लागू करा !

Advertisement

अन्यथा भरती प्रक्रिया स्थगित करून नव्याने जाहिरात काढा ; बहुजन रयत परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सुरू असलेल्या विविध विभागांतील पदभरतीपूर्वी अनुसूचित जाती प्रवर्गातील अ, ब, क, ड उपवर्गीकरण लागू करावे. अन्यथा सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया स्थगित करून उपवर्गीकरणानुसार सुधारित आरक्षणासह नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी बहुजन रयत परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
अनुसूचित जातींमधील मातंग समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला असून, या समाजाला आरक्षणाचा न्याय्य लाभ आणि शासकीय सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. उपवर्गीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, यासाठी समाजाच्या वतीने वेळोवेळी आंदोलने आणि निवेदनांद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, अद्याप याबाबत ठोस निर्णय झालेला नसल्याने समाजातील बेरोजगार तरुणांमध्ये नाराजी असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
सध्या एमपीएससीमार्फत मोठ्या प्रमाणावर पदभरती सुरू आहे. अशा परिस्थितीत उपवर्गीकरण लागू न करता भरती प्रक्रिया राबविल्यास मातंग समाजातील गुणवंत उमेदवारांना आरक्षणाचा अपेक्षित लाभ मिळणार नाही आणि त्यांच्या प्रतिनिधित्वावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता परिषदेने व्यक्त केली आहे. त्यामुळे उपवर्गीकरण तातडीने लागू करून चालू भरती प्रक्रियेत कायदेशीर तरतुदींनुसार त्याचा लाभ देण्याबाबत निर्णय घ्यावा. हे शक्य नसल्यास भरती प्रक्रिया स्थगित करून उपवर्गीकरणानंतर सुधारित आरक्षणानुसार नव्याने जाहिरात काढावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, शासनाने यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन निर्णयाची निश्चित कालमर्यादा जाहीर करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. अन्य समाजांच्या आरक्षणाच्या हक्कांवर गदा आणण्याचा आमचा हेतू नसून, अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वाधिक मागास घटकांना आरक्षणाचा न्याय्य लाभ मिळावा, हीच भूमिका आहे. शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास बहुजन रयत परिषदेच्या वतीने राज्यभर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.