#

Advertisement

Tuesday, November 24, 2026, November 24, 2026 WIB
Last Updated 2026-11-24T13:10:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बळीराजाची रोहित पवारांना साथ... न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चात सहभागी व्हा !

Advertisement

 

ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

सोलापूर : राज्य शासनाकडून शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या 'न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा'मध्ये शेतकरी, शेतमजूर आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले आहे.
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ४ डिसेंबर २०२६ रोजी शेगाव व बुलढाणा येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून, ९ डिसेंबर रोजी हा मोर्चा नागपूर येथील विधान भवनावर धडकणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले.
यासंदर्भात बोलताना ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, राज्यातील शेतकरी विविध संकटांचा सामना करत आहेत. अतिवृष्टी, दुष्काळ आणि शेतीमालाच्या प्रश्नांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतमजुरांच्याही रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाकडून मदतीच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात शेतकरी आणि शेतमजुरांना दिलासा मिळेल, असे ठोस निर्णय अद्याप झालेले नाहीत. त्यामुळे सरकारचे लक्ष या प्रश्नांकडे वेधण्यासाठी रोहित पवार यांनी न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले आहे.
आमदार रोहित पवार यांनी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या भागांचा दौरा करून शेतकरी व शेतमजुरांशी संवाद साधला आहे. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा समजून घेतल्या आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शेतकरी आणि शेतमजुरांना शासनाकडून ठोस मदतीची अपेक्षा आहे. मात्र, अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नसल्याने हा मोर्चा महत्त्वाचा असल्याचेही कोमलताई यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी निघणाऱ्या या लढ्यात शेतकऱ्यांनी केवळ प्रेक्षक न राहता मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि शासनाकडून न्याय मिळवण्यासाठी रोहित पवार यांच्या या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले.


मोर्चातील प्रमुख मागण्या


  • गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीची जाहीर केलेली मदत तातडीने वितरित करावी.

  • शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी.

  • मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली पुढील दोन वर्षांसाठी स्थगित करावी.

  • शेतमजुरांसाठी स्वतंत्र रोजगार हमी योजना लागू करावी.

  • मच्छीमारांना भरीव आर्थिक मदत द्यावी.